
मालेगाव : टीसीएस कंपनीतील महिला कर्मचाऱ्याचे लैंगिक शोषण आणि सक्तीच्या धर्मांतराच्या प्रकरणाला आता राजकीय वळण मिळाले आहे. या प्रकरणातील एक संशयीत दानिश शेख याला मालेगावच्या ‘इस्लाम पार्टी’ने कायदेशीर बळ दिले. शुक्रवारी नाशिकरोड न्यायालयात झालेल्या जामीन अर्जावरील सुनावणीदरम्यान इस्लाम पार्टीने दानिशसाठी स्वतंत्र वकील दिला. उच्च व सर्वोच्च न्यायालयापर्यंत संघर्ष करण्याची तयारी इस्लाम पार्टीचे संस्थापक व माजी आमदार आसिफ शेख यांनी दर्शविली आहे.
टीसीएस प्रकरणात देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात दाखल लैंगिक अत्याचार व धर्मांतराचा प्रयत्न प्रकरणात पोलिसांनी संशयीत दानिश शेख, तौसिफ अत्तार आणि निदा खान यांच्याविरोधात दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. संशयीतांनी संगनमताने पीडितेचे शारीरिक, मानसिक आणि आर्थिक शोषण केले. पीडितेचे ‘हनिया’ असे नामकरण करून तिला बुरखा घालणे, रोजा ठेवणे आणि नमाज पठणाची सक्ती करण्यात आली. या प्रकरणात पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर संशयीत न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांच्या जामीन अर्जावर शुक्रवारी बचाव पक्षातर्फे युक्तिवाद करण्यात आला. यावेळी दानिशच्या वतीने इस्लाम पार्टीने नियुक्त केलेले ॲड. फैज वासिफ यांनी न्यायालयात बाजू मांडली. पोलिसांनी दाखल केलेल्या दोषारोपपत्रात कोणताही ठोस पुरावा नसून राजकीय दबावापोटी सुशिक्षित तरुणांना बळीचा बकरा बनवले जात आहे, असा युक्तिवाद त्यांनी केला.
इस्लाम पक्षाची कायदेशीर मदत का?
यावेळी इस्लाम पार्टीचे संस्थापक व माजी आमदार आसिफ शेख स्वतः न्यायालयात हजर होते. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी पोलिसांच्या कारवाईवर तीव्र आक्षेप घेतला. हा सर्व प्रकार कार्यालयातील कर्मचाऱ्यांमधील मैत्रीचा होता. मात्र, काही जातीयवादी घटकांनी त्याला जाणीवपूर्वक धार्मिक आणि लव्ह जिहादचे नाव देऊन वेगळे रुप दिले. दानिशचे कुटुंबीय प्रचंड घाबरलेले आहे. इस्लाम पक्षाकडे मदतीसाठी हे कुटुंबीय मालेगावमध्ये आले होते. त्यानुसार आम्ही त्यांना कायदेशीर मदत पुरवत असल्याचे आसिफ शेख यांनी नमूद केले.
दरम्यान, संशयीत निदा खानला छत्रपती संभाजीनगरमध्ये आश्रय दिल्यावरून एमआयएमचे नगरसेवक मतिन पटेल यांच्या अनधिकृत घरावर बुलडोजर चालविण्यात आला होता. या संदर्भात प्रश्न विचारल्यावर आसिफ शेख यांनी आपले घर वैध असून तिथे कोणी बुलडोजर आणला तरी संशयीताच्या कुटुंबियांच्या पाठिशी आपण उभे राहू असे शेख यांनी स्पष्ट केले. कोणासोबत अत्याचार होईल, सरकार त्याला जातीयवादाचा रंग देईल, तर या कुटुंबांसाठी आवाज कोण उठवेल, असा उलट प्रश्न त्यांनी उपस्थित केला. राजकीय दबावापोटी जर मुस्लिम तरुणांना लक्ष्य केले जात असेल, तर ही लढाई आम्ही नाशिक न्यायालयापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढू, असा इशाराही शेख यांनी दिला आहे.
निदा खानच्या जामिनासाठी युक्तिवाद
संशयीत निदा खानच्या जामिनासाठी देखील न्यायालयात युक्तिवाद करण्यात आला. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला आहे. आता काही जप्त करण्याचे राहिलेले नाही. दोषारोपपत्र दाखल झाले आहे. निदा खान ही गरोदर आहे. काही कलम तिच्यावर लागूच होत नाही, ही बाब न्यायालयात मांडण्यात आल्याचे ॲड. बाबा सय्यद यांनी सांगितले. तीनही संशयीतांच्या जामिनावरील बचाव पक्षाचा युक्तिवाद न्यायालयाने नोंदवून घेतला. यावर सरकारी पक्षाला आपली बाजू मांडण्याचे निर्देश दिले. जामीन अर्जावरील पुढील सुनावणी १९ जून रोजी होणार आहे.
