
मुख्य संपादक -अनिकेत मशिदकर,मालेगाव:
येथील महेश नागरी सहकारी पतसंस्थेतील कथित अपहार आणि लाखो रुपयांच्या ठेवी अडकल्याप्रकरणी गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संघर्षाला आता अत्यंत तीव्र वळण मिळाले आहे. जिल्हा उपनिबंधक (DDR) कार्यालयातील चर्चेचे गुर्हाळ पूर्णपणे फोल ठरल्यानंतर, अखेर पतसंस्थेच्या संचालक मंडळावर थेट फौजदारी गुन्हे (FIR) दाखल करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. लोकशाही धडक मोर्चाचे शेखर पगार आणि संतप्त ठेवीदारांच्या आक्रमक पवित्र्यामुळे प्रशासनाला हा कायदेशीर निर्णय घ्यावा लागला.
संचालकांची बेजबाबदार पाठ फिरवणी; बैठकीतच उडाला भडका
चार दिवसांपूर्वी उपनिबंधक कार्यालयात झालेल्या तीव्र ठिय्या आंदोलनानंतर, आज (शुक्रवारी) तोडगा काढण्यासाठी संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र, कोट्यवधी रुपयांच्या ठेवींचा प्रश्न असतानाही संचालक मंडळाने कमालीचा बेजबाबदारपणा दाखवला. पूर्ण संचालक मंडळाऐवजी अवघे ५ ते ६ सदस्यच बैठकीला उपस्थित राहिले.
या अपुर्या उपस्थितीतही डीडीआर यांनी शेखर पगार व ठेवीदारांसोबत चर्चा घडवून आणली. परंतु, उपस्थित संचालकांनी पैसे देण्यास स्पष्ट नकार दिला. “जर आज पैसे मिळालेच असते तर आम्हाला आंदोलन करण्याची गरजच भासली नसती,” असा संतप्त सवाल करत ठेवीदारांनी उपनिबंधक कार्यालयातच प्रशासनाला धारेवर धरले. ‘पैसे द्या, नाहीतर गुन्हे दाखल करा’ या एकाच मागणीवर ठेवीदार ठाम राहिले.
DDR सह ठेवीदार थेट एसपी कार्यालयात; ‘अप्पर पोलीस अधीक्षकां’सोबत खलबते
उपनिबंधक कार्यालयातील वाढता तणाव पाहता, जिल्हा उपनिबंधकांनी तात्काळ लोकशाही धडक मोर्चाचे शेखर पगार आणि ठेवीदारांच्या शिष्टमंडळाला सोबत घेऊन मालेगावचे अप्पर पोलीस अधीक्षक (Addl. SP) श्री. सूरज गुंजाळ यांचे कार्यालय गाठले.
अप्पर पोलीस अधीक्षक गुंजाळ यांच्या उपस्थितीत पोलीस आणि सहकार प्रशासनाने ठेवीदारांची समजूत काढण्याचा आणि सुवर्णमध्य साधण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र, “रक्ताचं पाणी करून ठेवलेला पै अन् पै परत मिळाल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही, पैसे मिळणार नसतील तर तातडीने संचालकांना गजाआड करा,” अशी आग्रही भूमिका नागरिकांनी घेतली.
तडजोडीअंती केवळ ‘एकच’ निर्णय… गुन्हे दाखल करा!
दीर्घकाळ चाललेल्या या बैठकीत सर्व बाजू तपासल्यानंतर आणि संचालक मंडळ पैसे देण्यास पूर्णपणे अपयशी ठरल्याचे स्पष्ट झाल्यावर, अखेर कायदेशीर तडजोडीअंती संचालक मंडळावर गुन्हे दाखल करण्याचा अंतिम निर्णय घेण्यात आला.
सहकार वर्तुळात मोठी खळबळ
लोकशाही धडक मोर्चाचे शेखर पगार आणि सर्वसामान्य ठेवीदारांनी कायदेशीर लढाईत मिळवलेला हा मोठा विजय मानला जात आहे. या धडक निर्णयामुळे मालेगावच्या सहकार क्षेत्रात एकच खळबळ उडाली असून, आता घोटाळेबाज संचालकांचे धाबे दणाणले आहेत. कष्टाचा पैसा परत मिळण्याच्या आशेने ठेवीदारांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे
