
मुख्य संपादक -अनिकेत मशिदकर : मालेगाव शहराची जीवनवाहिनी असलेल्या मोसम नदीचे पात्र सध्या कचरा डेपो बनले आहे. नदीपात्रात सर्वत्र पसरलेले कचऱ्याचे ढिगारे पाहून संतप्त झालेल्या मालेगावकरांनी आता प्रशासनाला जाब विचारण्यास सुरुवात केली आहे. स्वच्छतेच्या नावाखाली मोठ्या घोषणा केल्या जात असल्या, तरी प्रत्यक्ष जमिनीवरील परिस्थिती अत्यंत विदारक आहे.
शहरातील आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर असताना प्रशासनाचे मौन अनाकलनीय आहे. नदीपात्रातील हा कचरा केवळ आरोग्यासाठी घातक नाही, तर तो नागरिकांच्या जगण्याशी खेळणारा आहे. शहराच्या स्वच्छतेसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जात असताना, हा निधी नेमका कुठे जिरवला जातोय, असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत.
आता या प्रकरणाची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. नदीपात्रातील या कचऱ्याला जबाबदार कोण? असा सवाल संतप्त मालेगावकर प्रशासनाला विचारत आहेत. केवळ कागदोपत्री कामे दाखवून जनतेची दिशाभूल करणे आता थांबले पाहिजे. स्वच्छतेच्या निधीचा हिशोब प्रशासनाला द्यावाच लागेल.
मोसम नदी ही मालेगावची शान आहे, तिचे रूपांतर कचराकुंडीत करणाऱ्यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे. प्रशासनाने तातडीने नदीपात्रातील हा कचरा साफ करावा आणि भविष्यात अशी परिस्थिती निर्माण होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. अन्यथा, या संपूर्ण गैरकारभाराचा प्रशासनाला जाब द्यावा लागेल
