
प्रतिनिधी प्रदीप प्रजापत, मालेगाव :
शहरातील राजमाता अहिल्याबाई होळकर यांचा पुतळा असलेल्या सर्कल परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून पथदिवे बंद असल्याने हे महत्त्वाचे ठिकाण अंधारात बुडाले आहे. उद्घाटनानंतर या सर्कलच्या देखभालीकडे प्रशासनाने पूर्णपणे पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे.
राजमाता अहिल्याबाई होळकर यांचे कार्य प्रेरणादायी असून, त्यांच्या नावाने असलेल्या या सर्कलची दुर्दशा होणे ही खेदाची बाब आहे. हे ठिकाण शहराच्या मध्यवर्ती भागात असल्याने येथे नेहमी नागरिकांची ये-जा असते. मात्र, रात्रीच्या वेळी पसरलेल्या अंधारामुळे अपघातांची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच, समाजकंटकांचा वावर वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
स्थानिक नागरिकांनी अनेकदा या समस्येकडे महानगरपालिकेच्या विद्युत विभागाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रशासनाला याकडे सोयीस्करपणे विसर पडला आहे. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये प्रशासनाच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
मालेगाव महानगरपालिका प्रशासनाने राजमाता अहिल्याबाई होळकर सर्कलवरील पथदिवे तातडीने दुरुस्त करावेत आणि परिसरात योग्य प्रकाशाची व्यवस्था करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. जर येत्या काही दिवसांत या समस्येचे निराकरण झाले नाही, तर नागरिकांच्या वतीने आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
