
‘आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समिती’चे निखिल पवार यांनी मालेगाव वन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराविरुद्ध थेट राज्यपालांकडे तक्रार केली आहे. सहाय्यक वनसंरक्षक (ACF) शेखर तनपुरे हे गेल्या दोन वर्षांपासून मालेगाव येथे पूर्णवेळ कार्यरत नसून ते नाशिक येथूनच कामकाज पाहत आहेत. तसेच, वनपरिक्षेत्र अधिकारी गायत्री सोनवणे मॅडम यांच्यावरही कर्तव्यात कसूर केल्याचा आणि कार्यालयीन शिस्त न पाळल्याचा गंभीर आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे.
या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे मालेगाव वनहद्दीत अवैध वृक्षतोड, तसेच मुरूम, वाळू आणि मातीची तस्करी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. दरेगाव परिसरातील करोडो रुपयांची मुरूम चोरी आणि संरक्षित वनक्षेत्रातील खडी क्रेशरवर कोणतीही कारवाई झालेली नाही. लाकूड माफिया आणि सॉमिल धारकांना माहिती पुरवून त्यांच्या दबावात काम केले जात असल्याचेही या तक्रारीत म्हटले आहे.

स्थानिक नागरिकांच्या तक्रारीनुसार, सटाणा आणि ताराबाद येथील वन अधिकारी देखील कार्यालयात अनुपस्थित राहून नाशिकमध्ये वेळ घालवतात. नाशिक पूर्व विभागाचे उपवनसंरक्षक (DCF) राकेश सेपट हे या अधिकाऱ्यांना पाठीशी घालत असून, त्यांच्या वर्षभरातील केवळ एका दौऱ्यामुळे स्थानिक स्तरावर प्रशासकीय शिस्त कोलमडली आहे.

या संपूर्ण प्रकरणाची सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल लोकेशनद्वारे सखोल चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करून त्यांना निलंबित करावे, तसेच मालेगावला पूर्णवेळ कर्तव्यदक्ष आणि प्रामाणिक अधिकारी नियुक्त करावेत, अशी आग्रही मागणी निखिल पवार यांनी केली आहे.

