
डॅशिंग आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारताच राज्यातील भेसळखोरांचे धाबे दणाणले आहेत. “ग्राहकांना शुद्ध अन्न आणि शेतकऱ्यांना दुधाचा योग्य दर मिळालाच पाहिजे, नियम मोडणाऱ्यांची गय केली जाणार नाही,” अशा कडक शब्दांत एफडीए (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी भेसळ माफियांना थेट चेतावणी दिली आहे. राज्यातून भेसळ हद्दपार करण्यासाठी आता विभागाने कंबर कसली आहे.
अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाचा पदभार स्वीकारताच डॅशिंग आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी राज्यातील भेसळखोरांविरुद्ध अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांना कोणतीही सवलत दिली जाणार नाही, असा थेट इशारा देत मुंढे यांनी ‘सेफ फूड, सेफ ड्रग, सेफ महाराष्ट्र’ या मोहिमेअंतर्गत मोठी धडक कारवाई सुरू केली आहे. गेल्या अवघ्या ६ दिवसांत विभागाने राज्यभरात तब्बल २०३ ठिकाणी धाडी टाकल्या आहेत.
