नाशिक:
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत आयोजित नाशिक जिल्हा आंतरमहाविद्यालयीन मुलींच्या क्रिकेट स्पर्धेत महिलारत्न पुष्पाताई हिरे महिला महाविद्यालयाच्या संघाने चमकदार कामगिरी करत उपविजेतेपद पटकावले. या स्पर्धा ८ ऑक्टोबर २०२६ रोजी एच.पी.टी. महाविद्यालय, नाशिक येथे पार पडल्या.
या स्पर्धेत पुष्पाताई हिरे महिला महाविद्यालयाने के. के. वाघ महाविद्यालय, काकासाहेबनगर संघाचा ९ गडी राखून दणदणीत पराभव केला. त्यानंतर चुरशीच्या झालेल्या अंतिम सामन्यात के.टी.एच.एम. महाविद्यालयाकडून निसटता पराभव पत्करावा लागल्याने संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

पाच खेळाडूंची आंतरविभागीय स्पर्धेसाठी निवड
संघातील राष्ट्रीय खेळाडू तेजस्विनी वटवाल, ऐश्वर्या वाघ, नेहा शेलार, अंजली अहिरे आणि रागिनी सोनवणे यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. या कामगिरीच्या जोरावर त्यांची १४ ते १७ ऑक्टोबर २०२६ दरम्यान संदीप फाउंडेशन, नाशिक येथे होणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आंतरविभागीय स्पर्धेसाठी नाशिक जिल्हा संघात निवड झाली आहे.
या यशाबद्दल संस्थेचे जनरल सेक्रेटरी समाजश्री डॉ. प्रशांतदादा हिरे, उपाध्यक्ष डॉ. हरीश आडके, समन्वयक डॉ. अपूर्वभाऊ हिरे, युवानेते डॉ. अद्वय आबा हिरे पाटील, महाविद्यालयीन विकास समितीच्या अध्यक्षा डॉ. संपदा दीदी हिरे, महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रो. डॉ. मृणाल भारद्वाज, तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व माजी खेळाडूंनी संघाचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या संघाला क्रीडा संचालिका प्रो. डॉ. सुरेखा दप्तरे यांचे मार्गदर्शन लाभले.
